पेशवाई अखेरचा श्वास घेत होती | तिला वाचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या त्र्यंबकजी डेंगळे | यांचा संगमनेरजवळील निमगाव-जाळी वाडा
पेशवाई अखेरचा श्वास घेत होती, तिला हिमतीने वाचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या त्र्यंबकजी डेंगळे यांचा वाडा संगमनेरजवळील 'निमगाव-जाळी' येथे आपल्या महापुरुषाची यादगारी सांभाळत उभा आहे.
हे पण वाचा - छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज संपूर्ण माहिती
वाड्याच्या प्रशस्त भिंती, घडीव दगडांचे आकारबद्ध बांधकाम असे २५० वर्षांपूर्वीचे रांगडे रुप आता सुरकतलेल्या अवस्थेत आहे. चौसोपी वाड्याचे दोन भाग शिल्लक असून ते वापरात आहेत. लाकूड आजही उठून दिसून येते. दिवळ्या, कोनाडे काहीसे वेगळे आहे. देवघरात विठूमाऊली व साईबाबांनी दिलेली दत्तमूर्ती आपले चित्त वेधून घेते. दुसऱ्या चौकाजवळ साचेबंद आड, पडीक अवस्थेत असलेली घोड्यांची पागा आहे.
ऐतिहासिक वास्तूरंग-
त्रिंबकजी डेंगळा इंग्रज बहादुरांच्या कैदेतून पळून बंड करीत पळतो, त्याचा ठिकाणा लावून जिवंत अगर मेला सरकारात हवाली करुन देईल त्याजला बक्षिस २ लाख रुपये व १ हजार रुपयांचा इनाम गाव दिला जाईल. समस्त रयत ब्राम्हण, मराठे, वाणी, उदमी, मांग, रामोशी वगैरे जो कोणी डेंगळ्यांचा पत्ता सरकारात दाखवून देईल. त्यास पाच हजार रुपये बक्षिस व १ चाहूर जमीन इनाम देण्यात येईल. पत्ता ठाऊक असून न दिल्यास त्याचे पारिपत्य होईल.'*
वरील झालेल्या या जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही.
निमगाव-जाळीचा हा डेंगळे पेशव्यांकडचा हुजऱ्या नंतर जासूद आणि धाडसी वृत्तीने पेशव्यांच्या जवळचा कारभारी झाला. सदाशिव माणकेश्वरनंतर एलफिन्स्टनशी संपर्क ठेवण्याचे काम डेंगळेंकडे आले. त्याच्या स्पष्ट व चढाऊ धोरणामुळे एलफिन्स्टन नाराज झाला. बाजीरावच्या राजकारणास त्याचे धोरण उपयुक्त ठरले. जून १८१७ च्या तहानुसार बाजीरावाने शिंदे, होळकर, भोसले यांना एकत्र करुन राज्य खालसा करण्याचा घाट घातला. गणपतराव पानसे यांच्याकडील तोफखाना काढून प्रमुख त्र्यंबकजी डेंगळे झाला. पिढीजात सेवक दुखावले व एलफिन्स्टन यशस्वी झाला. इंग्रजांना येथून घालवून राज्य पुन्हा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा तो बोलू लागला.
गुजरात मधून इंग्रजांची हकालपट्टी करण्याचा त्र्यंबकजीचा डाव एलफिन्स्टनच्या लक्षात आला. नाईलाजाने बाजीरावाने एलफिन्स्टनशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार त्याला इंग्रजांच्या ताब्यात दिले. १२ सप्टेंबर १८१६ ला सायंकाळी पोतदार व त्र्यंबकजी तुरुंगाला भोक पाडून पसार झाले. पुढे त्याला श्रीमंतांकडून मदत मिळू लागली. लपूनछपून भेटीगाठी झाल्या. बाजीरावाने त्याला पकडण्याचे देखावेपण केले.
५ जुलै १८१७ रोजी बाजीराव-इंग्रज तह झाला आणि दुसरा बाजीराव हा संस्थानिक बनला. बाजीरावाचा आधार तुटला. त्र्यंबकजीची चौबाजूने कोंडी झाली. इंग्रजांनी देश गिळला. अखेर कॕप्टन स्वॕनस्टनच्या नेतृत्वाखाली अहिरवाडी येथे इंग्रजांना त्राही भगवान करुन सोडणारा त्र्यंबकजी डेंगळे पकडला गेला. ठाण्याची तुरुंगात रवानगी झाली आणि तेथून उत्तरप्रदेश येथील *चुनारच्या* किल्ल्यात सन १८२८ मध्ये या वीराचा अंत झाला.
सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांचा वाडा -
(निमगाव जाळी)




0 Comments