हर घर तिरंगा : घरावर तिरंगा फडकवण्यापूर्वी या दहा गोष्टी लक्षात ठेवा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट व 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आव्हान केले आहे.
सध्या देशभरात सोशल मीडियावर अनेक वाद प्रतिवाद घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच देशातील अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर तिरंगा लावला आहे. आता देशाच्या पंतप्रधानांनी घरावर तिरंगा फडकवण्याचा आव्हान केलं म्हटल्यावर सगळ्यांनाच घरावर तिरंगा फडकवण्याची उत्सुकता लागली आहे. परंतु घरावर तिरंगा फडकवण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही बाराच्या भावात जाऊ शकता. त्यासाठी आपल्या राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याबद्दल राष्ट्रध्वज संहिता माहीत असणे गरजेचे आहे.
भारताची राष्ट्रध्वज संहिता काय आहे ?
राष्ट्रध्वज फडकवताना ध्वज संहिता 2002 चे पालन करावं लागतं
याबरोबरच राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 चे देखील पालन करावे लागतं.
या संहितेच्या कलम दोन एक नुसार भारतातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही ठिकाणी राष्ट्रध्वजाचा मान ठेवून राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार आहे, म्हणजेच ध्वज फडकवण्यावर बंदी नाही. मात्र राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो आणि पहिल्यांदाच गुन्हा केला असेल तर दंड करण्याचीही तरतूद आहे. 26 जानेवारी 2002 ला राष्ट्रध्वजाबाबतची ही संहिता अस्तित्वात आली.
यापूर्वी राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधक कायदा 1971 व राष्ट्रीय प्रतीक व नाव कायदा 1950 अस्तित्वात होता.
या संहितेमध्ये अलीकडे दोन मोठे बदल करण्यात आले आहेत
पूर्वी राष्ट्रध्वज सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत फडकवण्याचा नियम होता, परंतु नियम बदलानुसार आता दिवसा व रात्री दोन्हीही वेळात राष्ट्रध्वज फडकवू शकतात. याबरोबरच पूर्वी फक्त खादीच्या कपड्याचा राष्ट्रध्वज बनवण्यास परवानगी होती. 30 डिसेंबर 2021 रोजी केलेल्या बदलानुसार खादीच्या कापडा ऐवजी पॉलिस्टर देखील वापरू शकतात.
घरावर राष्ट्रध्वज फडकवताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :
पूर्वी भारताची राष्ट्रध्वज संहिता खूप कठोर होती परंतु अलीकडे त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे संहितांमध्ये शिथिलता आहे तरी देखील ध्वज फडकवताना पुढील काळजी अवश्य घ्या.
1) राष्ट्रध्वज फडकवताना ध्वज मळलेला, फाटलेला आणि चुरगळलेला नसावा व तो योग्य ठिकाणी फडकवावा
2) तुम्ही राष्ट्रध्वज ज्या ठिकाणी फडकवणार आहात त्या ठिकाणी अन्य इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंचीचा नसावा.
3) कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
4) ध्वज फडकवताना नारंगी (भगवा) रंग वरती राहील याची दक्षता घ्यावी.
5) ध्वज स्तंभावर किंवा ध्वजावर कुठल्याही प्रकारचे फुल, पान, हार किंवा सजावटीचे साहित्य ठेवू नये.
6) ध्वजावर काहीही लिहू नये. ध्वजारने कोणतीही वस्तू झाकू नये.
7) ध्वजारोहणासाठी ध्वज तयार करत असाल तर त्यात फुले ठेवता येतील.
8) राष्ट्रध्वज जमिनीवर किंवा पाण्यावर पडलेला नसावा.
9) कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वज वापरू नये किंवा ध्वजाचा कपडा कमरेपेक्षा खाली वापरू नये. तसेच बेड, सोफा, रुमाल, टॉवेल ,अंतर्वस्त्र यासाठी ध्वजाचा कपडा वापरू नये.
10) ध्वज फडकवताना तो स्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.
ध्वज फडकवणे ही अभिमानाची बाब आहे तुम्ही तुमच्या घरावर जर ध्वज फडकवणार असाल तर वरील दहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आपल्याकडून चुकूनही ध्वजाचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्या. तुम्ही तुमच्या घरावर ध्वज फडकवणार आहात की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.


1 Comments
अत्यंत उपयुक्त माहिती
ReplyDelete