इथल्या व्यवस्थेचं शेतकऱ्यांशी फक्त मतदानापुरते नात आहे. तुम्हीच पहा आपल्याकडे शाळा, महाविद्यालये,कोर्ट,बँक, डाक सेवा, वेगवेगळे सरकारी दफ्तरे यांना वेळ ठरवून दिलेला असतो . साधारणतः यांची वेळ सकाळी १० ची असते. एवढेच काय संसद, राज्यसभा,विधानसभा, नगरपालिका यांची ही वेळ सकाळची असते. यांना थंडी लागू नये म्हणून ही वेळ एक दोन तास पुढे मागे देखील केली जाते. पण दुर्दैवाने आमच्या शेतकऱ्याला कधीच थंडी लागत नाही, त्याला ऊन लागत नाही, दम लागत नाही, त्याला वेळेवर तहान भूक लागत नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांची काम करण्याची वेळ ठरवली जात नाही. शेतकऱ्यांना वीज दिली की लोडशेडींग वाढते, म्हणून त्याला रात्री वीज दिली जाते. इकडे टीव्ही, फ्रिज, एसी सगळ व्यवस्थित चालते दिवसभर काम करून दमलेल्या साहेबांना रात्री व्यवस्थित झोप यावी म्हणून त्यांना चोवीस तास लाईट पुरवली जाते. इथले आमदार, मंत्री, उद्योजक अशा गरीब लोकांना आपल्याकडे सरकारकडून मोफत लाईट देऊन यांचे खाजगी बिल देखील माफ केली जातात , फक्त
आमच्या शेतकऱ्यांना लाईट देताना इथल्या व्यवस्थेला थकलेली बिल आठवतात. दिवसभर थकून आलेला शेतकरी लाईट ची वाट बघत अर्धवटच झोपतो आणि नुकताच डोळा लागतो तेंव्हा तुम्ही लाईट सोडता.
तो बिचारा थकलेल्या अवस्थेत तसाच उठून पुन्हा शेताकडे निघतो. रात्रीची लाईट तरी कुठं नीट असते, विहिरीवरील पंप सुरू करून शेतात पोहचत नाही तोच लाइटीची ये जा सुरू होते. मग रात्र भर तो बिचारा विहीर ते मळा अशा येरझाऱ्या मारत बसतो. येवढे सहन करून तो कसबस शेत पिकवतो. येवढ्या मेहनतीने पिकविलेल्या मालाला देखील योग्य भाव मिळत नाही. आणि याच मजबुरीचा फायदा घेऊन पुन्हा मत मागितलं जातं, त्याच्या भावनेशी खेळलं जातं, खोट्या आश्वासनाची पट्टी सांगून त्याच मत लुबाडले जाते.
@Maharashtra Prime News


0 Comments