बीडमध्ये शिवतीर्थावर शिवराज शक ३४९ व शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न...
बीड:- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (दि:-१२ जून २०२२) रोजी बीड येथील शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज स्मारक) शिवराज शक ३४९ प्रारंभ व शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्याभिषेकासाठी शिवतीर्थ परिवाराकडून ११ गडकोटांवरील व ७ नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. सकाळी ६ वाजता मारुती मंदिर, बशीरगंज ते शिवतीर्थ या परिसरात महाराजांचा पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकरा गडकोट व सप्त नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक घालण्यात आला, राज्याभिषेक सोहळ्यासाठी अकरा पती-पत्नी यांच्या जोड्या बसवण्यात आल्या होत्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचा मान ठेवून अगदी तंतोतंत वेळेत शिवराज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवतीर्थावरील सजावट, पालखीची पारंपारिक पद्धतीने मिरवणुक, आणि जिजाऊ धर्मयोद्धा ढोल ताशा पथकाने केलेले वादन यामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते.
छत्रपती श्री शिवशंभूच्या नेतृत्वाखाली शिवकार्य असेच घडत राहो व श्री शिवाजी श्री संभाजी रक्तगटाचा तरुण घडण्यासाठी असेच निस्वार्थी शिवकार्य करणाऱ्या तरुणांनी शिवतीर्थावर महाराजांकडून प्रेरणा घ्यावी असेही सांगण्यात आले. सदरील कार्यक्रमास बीड जिल्हा वकील संघ, पोलीस प्रशासन व सर्व शिवभक्तांचे सहकार्य लाभले.



0 Comments