शेतकरी पुत्र, सामान्य कार्यकर्ता ते सहा वेळा आमदार : विनायक मेटे यांची राजकीय कारकीर्द
एक सामान्य कार्यकर्ता ते पाच वेळा आमदार अशी होती विनायक मेटे यांची कारकीर्द.
विनायक मेटे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून आले होते. मेटे यांचं असामान्य कर्तृत्व नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा पुढे पाच वेळा आमदार होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं परंतु मेटे साहेबांनी ते करून दाखवलं. अजित पवार असो किंवा फडणवीस असो विनायक मेटे यांनी पाच वेळा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवलं. विधान परिषदेचे ते कायम सदस्य राहिले.
राजकीय प्रवास :
विनायक मेटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघातून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई येथील ऑफिस मधूनच ते काम करायचे. पुढे जाऊन 1994 मध्ये मराठा महासंघाचे ते सचिव झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका मराठा महासंघ स्थापनेपासूनच त्यांनी घेतली. आरक्षणाबरोबरच समाजाचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक संघटनेबरोबरच राजकीय पक्ष असायला हवा असं त्यांना वाटू लागलं यातूनच पुढे नव महाराष्ट्र विकास पक्षाची स्थापना करण्यात आली.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत हात मिळवण्याचा प्रयत्न नवमहाराष्ट्र विकास पक्षाने केला परंतु त्यात त्यांना यश मिळालं नाही.
काँग्रेसने सरळ नकार दिल्याचं गोपीनाथ मुंडे यांना कळाल्यानंतर त्यावेळी मराठवाड्यात बॅकफूटवर असलेल्या भाजपला थोडं तरी बळ मिळेल या हेतूने गोपीनाथ मुंडे यांनी नवमहाराष्ट्र विकास पक्षाला भाजप-सेना युतीत सामील करून घेतलं. 1995 मध्ये युतीचे सरकार स्थापन झाले आणि दिलेल्या शब्दाला जागत गोपीनाथ मुंडे यांनी नवमहाराष्ट्र विकास पक्षाला विधान परिषदेची एक जागा दिली. अशाप्रकारे सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी पुत्राला पहिल्यांदा आमदारकी मिळाली. त्यानंतर विनायक मेटे यांनी कधी मागे वळून पाहिले नाही, सतत मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला याबरोबरच मराठा समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले.
पुढे 1999 मध्ये राज्यात सत्ता बदल झाला. युतीचे सरकार जाऊन राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार स्थापन झाले. विनायक मेटे यांचा महाराष्ट्र लोक विकास पक्षांमध्ये धबधबा वाढला होता त्यांनी पक्षाला नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रवादी पक्षात विलीन करून टाकले. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना सलग दोन वेळा विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. एकीकडे पक्षीय राजकारण सुरू असतानाच विनायक मेटे यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली व मराठा आरक्षण मुद्दा उचलून धरला. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढे 2012 मध्ये शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली.
मराठा समाजाच्या प्रश्नावर ही संघटना महाराष्ट्रभर काम करत होती, महाराष्ट्रभरातून शिवसंग्राम संघटनेला बळ मिळू लागलं कार्यकर्ते जोडले गेले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विनायक मेटे यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं. विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेमार्फत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर दौरे केले. यादरम्यान त्यांना असंख्य कार्यकर्ते मिळत गेले याचाच उपयोग त्यांनी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला. अजित दादा पवार आणि आर आर आबा पाटील यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली. दरम्यान विनायक मेटे यांची शिवसंग्राम आणि छगन भुजबळ यांची समता परिषद यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद विवाद सुरू झाले. इथून पुढे मेटे यांचे राष्ट्रवादीचे नेत्यांसोबत खटकू लागले. हा वाद सुरू असतानाच 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी ते नाशिकला गेले आणि त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्यांच्यापासून अनेक मराठा संघटना बाजूला झाल्या. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विनायक मेटे यांनी आघाडी सरकार विरोधात रोखठोक बोलण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षण मुद्दा नेहमीप्रमाणे उचलून धरला आता पुन्हा मराठा समाजाला आणि मराठा संघटनांना विनायक मेटे आपले वाटू लागले.
त्यावेळी भाजपला महाराष्ट्रात मराठा चेहरा मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि विनायक मेटे यांना भाजप युतीत सामील करून घेतले. 2016 मध्ये विनायक मेटे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवण्यात आले. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या समितीचे ते अध्यक्ष होते. स्मारक समिती पदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांची नियुक्ती केली होती. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रामध्ये जाऊन शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र पुढे चार वर्षे यावर कोणतेही काम झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची किती असावी यापलीकडे चर्चा झाली नाही आणि तो मुद्दा तसाच राहिला.
पुढे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल तेव्हा 2020 मध्ये विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
विनायक मेटे हे नेहमी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत होते, त्यांनी मराठा आरक्षण मुद्दा नेहमी उचलून धरला. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षण मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. याबरोबरच मराठा आरक्षण मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनाही अनेक वेळा लक्ष केल्याचं दिसून येतं.
थोडक्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका नेहमीच आक्रमक होती याबरोबरच सत्ता केंद्र राजकारण करण्यात मेटे नेहमी अग्रेसर होते. विनायक मेटे हे नेहमी मराठा आरक्षणासाठी लढले. आणि दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे साडेपाच वाजता मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या बैठकीला मुंबईला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली.





0 Comments