Header Ads Widget

टाटा एक पोलादी उद्यम गाथा हे पुस्तक नक्की वाचा

 ‘टाटायन_एक_पोलादी_उद्यम_गाथा'

आपल्यातील बहुतेकांनी लहानपणी ऐकलेलं असतं की, "टाटा ही कंपनी सुई पासून ते ट्रक पर्यंत" अशा प्रत्येक प्रकारच्या वस्तू बनवते. त्यामुळे टाटा विषयी नेहमीच मनात कुतुहल आणि एक प्रकारचे अप्रूप वाटत असते. त्यामुळे टाटायन हे टाटा उद्योग समूहाच्या जडणघडण विषयी असलेले पुस्तक माहित झाल्यावर ते वाचण्याची इच्छा न होणं असं शक्यच नव्हतं आणि त्यातही ते श्री गिरीश कुबेर यांच्या लेखणीतून साकारले म्हटल्यावर हे पुस्तक केवळ वाचनीय आणि अभ्यासपूर्णच नाही तर हे पुस्तक आपल्याला टाटा विश्वात घेऊन जाणार आणि प्रत्येक घटना आपण पाहत आहोत असे अप्रतिम वर्णन असणार याची खात्री होती आणि त्या विश्वासाला किंचित देखील धक्का लागला नाही.



 ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणीव होते ती टाटां म्हणजे ब्रँड, टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे कर्मचाऱ्यांचे हित, टाटा म्हणजे भव्य दिव्यता जोपासून जमिनीवर असणे, टाटा म्हणजे संपत्ती निर्मिती मधील सात्विकता, टाटा म्हणजे लोकांबरोबर देशाचा विकास, टाटा म्हणजे दूरदृष्टी आणि काळाचे भान देखील.


हे पुस्तक आपल्याला सहज जाणीव करून देते की, आपन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टाटा द्वरे आपले विश्व कसे व्यापले आहे, काही निवडक नावे म्हणजे -टाटा मोटर्स, एअर इंडिया (सरकार ने ताब्यात घेतली होती आता पुन्हा टाटा कडे), भाभा अटोमिक रिसर्च सेंटर, इंडिया सिमेंट(ACC), न्यू इंडिया अशुरन्स, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को), टाटा पॉवर, टीसीएस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन हॉटेल्स, लॅक्मे, वेस्टसाइड, क्रोमा, स्टार बाझार, स्टारबक्स, क्रोमा इत्यादी, एकंदरीत असे हे काही तगडे नावं आहेत.

इतकच काय तर दिवाळी आली की आपल्या सगळ्यांना दिवाळी स्नानासाठी आठवण होते ती "मोती साबण" देखील टाटाचीच !!!

लहान मुलांना, कॉलेज मधील तरुणांना आणि थोरा मोठ्यांना हाताच्या मनगटावर आवडणारे ब्रँड सोनाटा, फास्ट्रॅक आणि  टायटन ही सर्व घड्याळे टाटांची.

महिलांचा आवडता विषय मेकअप आणि त्यासाठी असणारा ब्रँड म्हणजे लॅक्मे देखील टाटा!, लॅक्मे हा फ्रेंच शब्द आहे, लॅक्मे म्हणजे सौंदर्य आणि संपत्ती चे प्रतीक. दागिन्यांचा ब्रँड तनिष्क सुद्धा टाटांचे.

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले सौंदर्याचे अस्सल प्रतीक असलेले 'ताज' हॉटेल!!! हे सुध्दा टाटांचे आणि त्याच्या निर्मितीचा हेतू काय आहे हे खुद्द जमशेठजी यांनी सांगितले, ताज हॉटेल सुरू झाल्यावर ते इंग्रजांना म्हणाले होते, "या हॉटेलची मालकी स्वतःकडे ठेवण्यात मला काडीचाही रस नाही... मला ईच्छा आहे ती आमच्या देशात असं काही करता येतं, हे दाखविण्याची... इतरांनी पाहून त्यापासून प्रेरणा घ्यावी, याची..."


इतिहास तसेच वर्तमान यांच्या जाणिवेतून खूप ठिकाणी या पुस्तकात विनोद निर्मीती करून पुस्तक अधिक रंजक झाले आहे जसे की, नुसेरवान यांचे मेहुणे दादाभाय यांचा मोठा मुलगा रतन (आरडी टाटा) यांची पहिली पत्नी मयत झाली तेंव्हा त्यांनी दुसरा विवाह फ्रेंच मुलगी सुझान ब्रायर हिच्याशी केला या 'फ्रेंच क्रांती' ने पारशांत त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली होती. 


निवडक किस्से -

टाटा एक विश्वसनीय ब्रँड 

प्रारंभापासून ते आजपर्यंत टाटांनी विश्वास आणि नावासाठी मोठी किंमत मोजली आहे म्हणून आज टाटा विश्वसनीय ब्रँड आहे.


1) टाटा नावाच्या अद्भुत ब्रँडची व्यापाराची सुरुवात झाली ती पांढऱ्या सोन्याने अर्थात कापूस. हा अगदी सुरवातीचा टप्पा. टाटांच्या कापूस कंपनीला अमेरिका यादवी युद्धाचा फायदा होऊन खूप नफा झाला परंतु नंतर अमेरिका यादवी युद्ध बंद झाल्याने कापूस कंपनी तोट्यात गेली कर्ज झाले, भागीदार पैसे मागायला लागले त्यामुळे जमशेटजी यांनी सर्वांना शब्द दिला, "तुमचे पैसे नक्की परत करेल फक्त मला थोडा वेळ द्या", मग त्या नुसार त्यांनी स्वतः चे उद्योग आणि स्वतः चे 7 मजली घर विक्री करून पैसे परत केले. येथूनच टाटावरील पोलादी विश्वास सुरू झाला आणि पुढे तोच विश्वास जे आर डी टाटा व रतन टाटा यांनी देखील वृद्धिंगत केला.

2) रतन टाटा यांनी 'टाटा इंडिका' ही पहिली पूर्णतः भारतीय बनावटीची कार लाँच केली आणि तिची विक्री देखील प्रचंड झाली परंतु तेवढ्याच वेगाने मोटारी बाबत तक्रारी सुरू झाल्या, काचा सहज खाली वर न होणे, इंजिन समस्या, वेग नियंत्रण समस्या, त्यामुळे टाटा तर्फे देशभर मेळावे घेऊन इंजिन बदलून देण्यापासून ते ग्राहक समाधान आणि इंडिका निर्दोष होण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व कंपनी करेल असा शब्द रतन टाटांनी दिला आणि पूर्ण केला.

3) नॅनो मोटार एक लाखात देतो असे सांगितले आणि निर्मिती खर्च अधिक झाला तरी नोंदणी करणारांना एक लाखात रतन टाटांनी नॅनो मोटर दिलीच. 

4) स्थानिक लोकांचा विकास - 

टाटांनी 1987 ला घड्याळाची कंपनी सुरू केली ती होसुर या तामिळनाडू मधील गावात. इथे फक्त शेती हेच उत्पादनाचे साधन होते, पिढी नुसार जमिनीचे तुकडे होऊन गरिबी वाढलेली, सामन्या उद्योग पतीने नवीन कारखान्यात प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवले असते परंतु टाटांनी त्याच गावातील 12 वी पास 400 मुलांना प्रशिक्षण देऊन कामावर घेतले मग यांनी कामही तसेच केले आणि बघता बघता तेथे 3 कंपन्या झाल्या हजारो लोक कामाला लागले आणि त्यातून उभारला गेला तो 'टायटन' ब्रँड, आणि 2001 ला भारतातील अत्यंत लोकप्रिय ब्रँड म्हणून देखील 'टायटन' ची निवड झाली.

अस्सल प्रेरणादायी प्रसंग आणि इतिहास तसेच वर्तमान यांच्या जाणिवेतून अभ्यासातून निर्माण झालेले विनोद वाचण्यासाठी आणि उद्योगपतीने आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी कशी व का घ्यावी हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे टाटा संस्कृती काय आहे हे माहिती असूनही ती समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमची देखील प्रतिक्रिया कळवा.

ह्या पुस्तकातून सांगण्यासारखे असे खूप काही आहे परंतु त्यासाठी ते वाचनेच योग्य ठरेल.

हे पुस्तक नक्की वाचा नक्की प्रेरणा मिळेल


पुस्तक - टाटायन - एक पोलादी उद्यम गाथा

लेखक : श्री. गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे : 434

किंमत - 500 ₹

#टाटायन #वाचन #गिरीश #कुबेर #पुस्तक_परिचय

लेख :  अंकुश जाधव (PSI)

Post a Comment

0 Comments